तिळाचे पीक पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. बियाणे बारीक असल्यामुळे जमीन चांगली भुसभुशीत तयार करावी. जमीन तयार करताना प्रति हेक्टरी दहा टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे. उन्हाळी हंगामाकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने "एकेटी-101' ही तिळाची जात प्रसारित केली आहे. या जातीचे गुणधर्म म्हणजे ही जात 90 ते 95 दिवसांत पक्व होते. दाण्याचा रंग पांढरा आहे. तेलाचे प्रमाण 48 ते 49 टक्के असून, उत्पादन प्रति हेक्टरी सात ते आठ क्विंटल मिळते. याचबरोबरीने पीकेव्ही एनटी-11 ही जात उन्हाळी हंगामासाठी शिफारशीत आहे. ही जात 95 ते 105 दिवसांत पक्व होतो. दाण्याचा रंग पांढरा आहे. तेलाचे प्रमाण 48 टक्के असून, उत्पादन प्रति हेक्टरी सात ते आठ क्विंटल मिळते.

उन्हाळी हंगामाकरिता प्रति हेक्टरी चार किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम कार्बेन्डाझिमची बीजप्रक्रिया करावी. लागवड फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी. पेरणीला उशीर झाल्यास पीक कापणीच्या वेळेला मॉन्सूनपूर्व पावसात सापडण्याची भीती असते. बियाणे फार बारीक असल्यामुळे समप्रमाणात वाळू/ गाळलेले शेणखत/ राख/ माती मिसळावी. तिफणीने 30 सें.मी.वर पेरणी करावी. माती परीक्षणानुसार पेरणीच्या वेळी अर्धे नत्र (12.5 किलो प्रति हेक्टरी) आणि पूर्ण स्फुरद (25 किलो प्रति हेक्टरी) देऊन दुसरा हप्ता पेरणीनंतर 30 दिवसांनी उरलेल्या नत्राचा (12.5 किलो प्रति हेक्टरी) द्यावा. तसेच पेरणीच्या वेळी झिंक व सल्फर या खतांच्या मात्रा 20 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात दिली असता उत्पादनात वाढ होते. पेरणीनंतर सात-आठ दिवसांनी नांगे भरावेत.

संपर्क - 18002330724
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

स्त्रोत: अग्रोवन