या व्हिडिओमध्ये कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या एकात्मिक व्यवस्थापनावर सविस्तर माहिती दिली आहे. भारतात, विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये, बीटी कपाशीवर या किडीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे उत्पादनात होणारी घट आणि आर्थिक नुकसान यावर प्रकाश टाकला आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने (CICR) या किडीच्या नियंत्रणाचे जीवनचक्र आणि नियंत्रणासाठी पेरणीची योग्य वेळ, आश्रय पिकांचा वापर, कामगंध सापळे आणि जैविक नियंत्रण यांसारख्या विविध उपाययोजना सुचवल्या आहेत. शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सामूहिक प्रयत्नांद्वारे या समस्येचे निराकरण करण्यासाठी संस्थेने राबवलेल्या मोहिमेचे महत्त्व यात अधोरेखित केले आहे. व्हिडिओची लिखित प्रत कपाशीच्या लागवडीखालील क्षेत्र व उत्पादनाच्या दृष्टीने भारत जगात प्रथम क्रमांकावर असून देशात कपाशीची जवळपास १२२ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. त्यापासून सुमारे ३५६ लाख गाठींचे उत्पादन मिळते. देशातील कापूस उत्पादक राज्यांमध्ये महाराष्ट्र हे राज्य अग्रेसर असून २०१७-१८ मध्ये ४२ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली. जनुकीय बदल केलेल्या कपाशीला व्यावसायिक तत्त्वावर लागवडीसाठी परवानगी देणाऱ्या काही प्रमुख राष्ट्रांपैकी भारत एक राष्ट्र आहे. भारतात कापसाखालील एकूण क्षेत्राच्या ९३ टक्के क्षेत्रावर जनुकीय बदल केलेल्या कपाशीची म्हणजेच बीटी कपाशीची लागवड केली जाते. महाराष्ट्रात याची टक्केवारी ९५ पेक्षा जास्त आहे. किडींमुळे होणारे नुकसान हे कपाशीची उत्पादकता कमी असण्याच्या अनेक कारणांपैकी एक आहे. कपाशीवर पेरणीपासून ते वेचणीपर्यंत विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट येऊन आर्थिक नुकसान होते. या पिकावर येणाऱ्या किडींमध्ये प्रामुख्याने रसशोषक किडी जसे की मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, पिठ्या ढेकूण, मिरिड ढेकूण इत्यादी. तसेच बोंडअळ्यांमध्ये अमेरिकन बोंडअळी, ठिपक्याची बोंडअळी व गुलाबी बोंडअळी यांचा समावेश आहे. वेळेवर व्यवस्थापन न केल्यास या किडींपासून सरासरी ३० टक्के पर्यंत उत्पादनात घट येण्याची शक्यता असते. प्रमुख उपद्रवी किडींपैकी अमेरिकन बोंडअळीच्या नियंत्रणासाठी भारतात सन २००२ मध्ये एक जनुकीय आणि २००६ मध्ये द्विजनुकीय बीटी कापूस लागवडीसाठी कायदेशीर मान्यता देण्यात आली. बीटी कापूस हा प्रामुख्याने अमेरिकन बोंडअळीचे प्रभावी नियंत्रण करतो. सोबतच ठिपक्याची बोंडअळी, गुलाबी बोंडअळी व इतर पतंगवर्गीय किडींपासूनही नियंत्रण मिळते. पण मागील तीन-चार वर्षांपासून भारताच्या काही भागात बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. साल २०१७ च्या कापूस हंगामात महाराष्ट्र, तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेश ही प्रमुख कापूस उत्पादक राज्ये गुलाबी बोंडअळीच्या सावटाखाली होती. या राज्यांमध्ये ८ ते ९२ टक्के पर्यंत प्रादुर्भाव दिसून आला ज्यामुळे १० ते ३० टक्के पर्यंत उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून भारतामध्ये जे प्रमुख राज्य आहेत कपाशी अंतर्गत त्याच्यामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे. २०१५ मध्ये गुजरातमध्ये जवळपास ७० ते ८० टक्के प्रादुर्भाव आढळून आला. नागपूर स्थित केंद्रीय कापूस संशोधन संस्थेमध्ये २०१० पासूनच बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा होणारा प्रादुर्भाव आणि बीटी जनुकाप्रती निर्माण झालेल्या प्रतिकारक्षमतेचा अभ्यास सुरू केला. देशाच्या वेगवेगळ्या कापूस उत्पादक राज्यांमधून हिरव्या बोंडाचे नमुने गोळा करून गुलाबी बोंडअळीच्या स्थितीचे आकलन करण्यात आले. बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाची अनेक कारणांपैकी आश्रय पीक म्हणजेच रिफ्युज न लावणे, मुख्यत्वे कापूस हेच खाद्य असणे, दीर्घ कालावधीच्या संकरांची लागवड, संकरांची मोठी संख्या, पिकाचा कालावधी लांबविणे, वेळेवर व्यवस्थापनाचा अभाव, कच्च्या कापसाची दीर्घकालीन साठवणूक आणि क्राय १ एसी व क्राय २ एबी या दोन्ही जनुकाप्रती तयार झालेली प्रतिकारक्षमता इत्यादी काही प्रमुख कारणे आहेत. गुलाबी बोंडअळी ही प्रामुख्याने कपाशीच्या बियांवर उपजीविका करते. अळीने पोखरलेल्या छिद्राच्या लगतचा कापूस डागाळतो ज्यामुळे गुणवत्ता खराब होऊन आर्थिक नुकसान होते. या किडीची अळी बोंडाच्या आतमध्ये राहून खात असल्यामुळे वरून सहजासहजी प्रादुर्भाव झालेला दिसून येत नाही. या किडीच्या प्रादुर्भावामुळे बोंडे उमलण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. प्रादुर्भाव साधारणतः कापूस हंगामाच्या मध्यापासून म्हणजेच लागवडीनंतर ९० दिवसांपासून पुढे सुरू होतो व शेवटपर्यंत वाढत जातो. परंतु अलीकडील तीन ते चार वर्षांपासून मध्य व दक्षिण भारतातील कापूस पट्ट्यात ही कीड ४५ ते ६० दिवसांच्या बीटी कपाशी पिकावरच प्रादुर्भाव करताना आढळून आली आहे. प्रादुर्भावाची तीव्रता स्थानपरत्वे कमी-अधिक झालेली पाहावयास मिळते. कोरडवाहू कापसाच्या तुलनेत ओलिताखालील कपाशीमध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव जास्त असल्याचे दिसले. अर्धवट उमललेली फुले किंवा डोमकळ्या, हिरव्या बोंडावर निकास छिद्र, बोंडे फोडून पाहिल्यास आत जिवंत अळ्या, अर्धवट उमललेल्या बोंडांमध्ये डागाळलेला कापूस, कामगंध सापळ्यांमध्ये नर पतंग अडकलेले दिसणे इत्यादीवरून गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे समजावे. गुलाबी बोंडअळीचे उगमस्थान हे भारत-पाकिस्तान आहे. पण या किडीचे अस्तित्व जगभरात ११० देशांमध्ये आढळून येते. मादी पतंग नवीन पालवी, पाते, फुले व हिरव्या बोंडावर एकल किंवा समूहाने अंदाजे २०० अंडी घालते. साधारणपणे चार ते पाच दिवसांनी अंड्यांमधून अळ्या बाहेर पडून बोंडांमध्ये प्रवेश करतात. अळ्या ९ ते १४ दिवस आत भक्षण करून कोशावस्थेत जातात. पूर्ण वाढ झालेली अळी ही सरासरी १२ ते १५ मिलीमीटर लांबीची असते. कोशावस्था ही ८ ते १३ दिवसांची असते व त्यातून निघणारे पतंग संध्याकाळी किंवा पहाटेच्या वेळीच बाहेर पडतात. गुलाबी बोंडअळी सरासरी ३० ते ३५ दिवसात जीवनचक्र पूर्ण करते. येणाऱ्या हंगामातही गुलाबी बोंडअळीचा बीटी कपाशीवर प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा संभाव्य धोका डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने या किडीच्या व्यवस्थापनासाठी एक रणनीती तयार केलेली आहे. जी लोकसहभागातून सामूहिक पातळीवर राबवली जाणे आवश्यक आहे. यामध्ये पूर्वहंगामी कापसाची लागवड टाळणे, पेरणी शिफारशीत वेळेत म्हणजेच जून महिन्यात करणे, रसशोषक किडींना प्रतिरोधक व कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या संकरित किंवा सरळ वाणांची लागवड, आश्रय पिकांचा अवलंब, पेरणीच्या ४५ दिवसानंतर कामगंध सापळे लावणे, नैसर्गिक मित्र कीटकांसाठी उपयोग, पिकाच्या सुरुवातीच्या तीन महिन्याच्या काळात कीटकनाशकाची फवारणी टाळणे, कीटकनाशकाच्या मिश्रणाचा उपयोग न करणे, आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास म्हणजेच ८ पतंग प्रति सापळा प्रति दिन सलग तीन दिवस किंवा १० टक्के हिरव्या बोंडांमध्ये जिवंत अळी दिसल्यास आवश्यकतेनुसार शिफारस केलेल्या कीटकनाशकाचा उपयोग, डिसेंबर-जानेवारीत पीक संपुष्टात आणणे, अंतिम वेचणीनंतर प्रादुर्भावग्रस्त पिकात काही वेळेसाठी जनावरे चरावयास सोडणे, पिकाच्या अवशेषाचा नायनाट करणे, खोडवा पीक न घेणे, पिकांची फेरपालट करणे, प्रादुर्भावग्रस्त व डागाळलेला कापूस गोदामामध्ये न साठवणे तसेच मार्केट यार्ड तथा जिनिंग मिल परिसरात प्रकाश सापळे अथवा कामगंध सापळ्यांचा उपयोग करून सामूहिकरित्या पतंग पकडणे इत्यादी बाबी समाविष्ट आहेत. पुढच्या हंगामात संभाव्य नुकसान टाळण्यासाठी संस्थेने व्यापक प्रमाणावर जागरूकता अभियान सुरू केले असून यामध्ये शेतकरी मेळावे, चर्चासत्र, प्रेस सूचना, वर्तमानपत्रातून लोकप्रिय लेख, आकाशवाणी व दूरदर्शनवरून संदेश, विस्तार पुस्तिकांचे प्रादेशिक भाषांमध्ये प्रकाशन व वितरण, मोबाईलवरून ध्वनी संदेश, हवामान आधारित साप्ताहिक कापूस सल्ला इत्यादी कार्यक्रमाचा समावेश आहे. गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन मोहिमेकरता कापूस उत्पादनाशी संबंधित सर्व भागधारकांचा सहयोग आवश्यक आहे.