सुरू उसाची लागवड 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान करावी. उसाची लागवड पट्टा पद्धतीने करण्यासाठी रिजरच्या साह्याने अडीच किंवा तीन फूट अंतरावर सऱ्या पाडाव्यात. सलग दोन सऱ्यांत लागवड करून तिसरी सरी मोकळी ठेवावी. त्यामुळे अडीच ते पाच फूट किंवा तीन ते सहा फूट अंतरावर जोड ओळींची पट्टा पद्धतीने लागवड करणे सुलभ होते.
सुरू उसाची लागवड डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत केली जाते; परंतु लागणीचा योग्य कालावधी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी हा आहे. या उसाची तोडणी साधारण 12 ते 14 महिन्यांनी केली जाते. सुरू ऊस घेण्यापूर्वी खरीप हंगामात कडधान्याचे अथवा गळिताचे पीक घ्यावे किंवा हिरवळीचे पीक ताग, धैंचा घेऊन ते जमिनीत गाडले असता सुरू उसाच्या उत्पादनात वाढ होते व जमिनीची सुपीकता चांगली राहते.

उसाचे उत्पादन हवामानावर बरेचसे अवलंबून असते. 24 ते 30 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानात उसाची वाढ चांगली होते. डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात तापमान कमी असते. त्यामुळे ऊस उगवणीस एक ते दीड महिन्याचा कालावधी लागतो. उसाची वाढ सूर्यप्रकाशात चांगल्या प्रकारे होते. पक्वतेच्या काळात 15 अंश सेल्सिअस तापमान साखर उताऱ्यास पोषक असते. ऊस लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी एक ते दीड मीटर खोलीची, मध्यम ते भारी जमीन, 60 टक्क्यांपेक्षा जादा जलधारणशक्ती असणारी तसेच नदीकाठच्या गाळाच्या सुपीक जमिनी उसासाठी योग्य असतात. जमिनीचा सामू 6.5 ते 8.5, क्षारांचे प्रमाण 0.5 टक्क्यापेक्षा कमी व चुनखडीचे प्रमाण 15 टक्क्यांपेक्षा कमी आणि सेंद्रिय कर्ब किमान 0.5 टक्का असावे.

उसासाठी निवडलेल्या जमिनीची पूर्वमशागत चांगली करावी. यासाठी पहिली उभी आणि नंतर दुसरी आडवी खोल नांगरट करावी. नांगरणीनंतर कुळव चालवून ढेकळे फोडावीत. दुसऱ्या नांगरणीपूर्वी हेक्टरी 20 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत द्यावे. कुळवणीनंतर मैंद चालवून जमीन सपाट करावी. मध्यम प्रकारच्या जमिनीत एक मीटर आणि भारी जमिनीत 1.20 मीटर अंतरावर सऱ्या पाडाव्यात.

जमीन सपाट असल्यास (0.3 टक्क्यापर्यंत उतार) 40 ते 60 मीटर अंतरावर आडवे पाट पाडून लांब सरी पद्धतीचा अवलंब करावा. उसाची लागण पट्टा पद्धतीने करावयाची असल्यास रिजरच्या साह्याने अडीच किंवा तीन फूट अंतरावर सऱ्या पाडाव्यात. सलग दोन सऱ्यांत लागवड करून तिसरी सरी मोकळी ठेवावी. त्यामुळे अडीच ते पाच फूट किंवा तीन ते सहा फूट अंतरावर जोड ओळींची पट्टा पद्धतीने लागवड करणे सुलभ होते. ऊस लागणीपूर्वी सेंद्रिय खताचा दुसरा हप्ता हेक्टरी 20 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत सरीमध्ये टाकावे. कंपोस्ट/ शेणखत उपलब्ध नसल्यास लागणीपूर्वी ताग/ धैंचा यासारखी हिरवळीची पिके घेऊन जमिनीत गाडावीत.

जातींची निवड

सुरू ऊस पीक शेतामध्ये 12 ते 14 महिने उभे असते यासाठी लवकर तसेच मध्यम पक्व होणाऱ्या जातींची निवड करावी. पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने सुरू हंगामासाठी को. 86032 (नीरा), को.एम. 0265 (फुले-265), को. 94012 (फुले सावित्री), को. 92005 (फुले 92005) वाणांची शिफारस केली आहे.

बेणेप्रक्रिया

ऊस बेणेप्रक्रिया करून उसाची लागवड करावी. उसाच्या कांडीवरील खवले कीड, पिठ्या ढेकूण तसेच काणी रोगाच्या नियंत्रणासाठी 300 मि.लि. मॅलॅथिऑन (50 टक्के प्रवाही) + 100 ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति हेक्टरी 100 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात बेणे दहा मिनिटे बुडवावे. बुरशीनाशकाची प्रक्रिया केलेले बेणे अर्धा तास सुकल्यानंतर जिवाणू संवर्धकाची बेणेप्रक्रिया करावी. यासाठी 100 लिटर पाण्यामध्ये दहा किलो ऍसेटोबॅक्टर आणि 1.25 किलो स्फुरद विरघळवणारे जिवाणू संवर्धक विरघळवावे. अशा द्रावणामध्ये हे बेणे 30 मिनिटे बुडवावे. त्यामुळे ऍसेटोबॅक्टर जिवाणू बेण्याच्या पेशीमध्ये प्रवेश करून नत्राची बचत करतात आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू जमिनीतील स्फुरद ऊसवाढीसाठी उपलब्ध करून देतात. अशा प्रकारच्या जिवाणूंच्या बीजप्रक्रियेमुळे नत्रामध्ये 50 टक्के, तर स्फुरदच्या मात्रेत 25 टक्के बचत होते.

लागवडीचे तंत्र
सुरू उसाची लागण करण्यासाठी दोन डोळे टिपरी पद्धतीने लागण करावी. दोन डोळ्यांचे टिपरे तयार करताना डोळ्यांच्या वरील 1/3 भाग ठेवून धारदार कोयत्याने बेणे छाटावे. ऊस लागण करताना दोन टिपऱ्यांमधील अंतर 15 ते 20 सें.मी. ठेवावे. मध्यम काळ्या जमिनीसाठी (एक मीटर सरी अंतर) हेक्टरी 30,000 टिपरी व भारी जमिनीसाठी (1.2 मीटर सरी अंतर) हेक्टरी 25,000 टिपरी बेणे लागते.
आंतरमशागत
ऊस एक महिन्याचा असताना नांग्या असल्यास भरून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी लागण करतेवेळी व पाण्याच्या पाटात जादा एक डोळ्याच्या टिपऱ्या लावून या रोपांचा वापर करावा आणि पाणी द्यावे. उसाचे पीक पहिल्या 90 दिवसांपर्यंत तणविरहित ठेवावे. त्यासाठी शिफारशीनुसार तणनाशकांचा वापर करावा.

अट्राझीन हा घटक असलेले तणनाशक हेक्टरी पाच किलो किंवा मेट्रीब्युझिन हा घटक असलेले तणनाशक हेक्टरी दीड किलो प्रति 1000 लिटर पाण्यात मिसळून ऊस लागवडीनंतर तीन ते चार दिवसांनी वाफसा असताना फवारावे. फवारणी करताना फवारणी केलेले क्षेत्र तुडवू नये. यासाठी मागे-मागे चालून फवारणी करावी. फवारणी नोझल जमिनीलगत धरावा त्यामुळे फवारणी एकसारखी होते. फवारणीनंतर तीन ते चार दिवस कोणत्याही प्रकारची मशागत करू नये.

तणांचे प्रमाण अधिक असल्यास लावणीनंतर 20 ते 25 दिवसांनी 2, 4-डी घटकयुक्त तणनाशकाची हेक्टरी 1.250 किलो प्रति 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हरळी व लव्हाळा या तणांच्या बंदोबस्तासाठी ऊस लागवडीनंतर दोन महिन्यांनी ग्लायफोसेट 2.5 किलो की लिटर प्रति 500 लिटर पाण्यात मिसळून फक्त तणांवर फवारणी करावी. तणनाशक पिकावर पडू देऊ नये. त्यासाठी प्लॅस्टिक हुडचा वापर करावा.

एकात्मिक पद्धतीने तणनियंत्रण पद्धतीचा अवलंब केल्यास खर्चात बचत होते. एकच पद्धत वापरल्यास खर्च वाढतो. फायदा कमी राहतो म्हणून तणांच्या बंदोबस्तासाठी एकात्मिक पद्धतीचा अवलंब करणे फायदेशीर ठरते. यासाठी ऊस लावणीनंतर तीन ते चार दिवसांनी मेट्रीब्युझीनयुक्त तणनाशक हेक्टरी 1.5 किलो व त्यानंतर 60 दिवसांनी 2, 4-डी क्षारयुक्त फॉर्म्युलेशन विचारणे घटक असलेले तणनाशक हेक्टरी 1.250 किलो याप्रमाणे फवारणी करून 90 दिवसांनी कोळपणी करावी.
मोठी बांधणी

ऊस लागवडीनंतर 16 ते 20 आठवड्यांनी रासायनिक खताची मात्रा देऊन पहारीच्या अवजाराने वरंबे फोडून आंतरमशागत करावी. सायन कुळव रिजरने मोठी बांधणी करावी. पाणी देण्यासाठी सऱ्या वरंबे दुरुस्त करून घ्यावेत.

रासायनिक खतांचे व्यवस्थापन

खत देण्याचे वेळापत्रक (किलो प्रति हेक्टरी)
क्र. +खतांचा हप्ता देण्याची वेळ +नत्र (युरिया) +स्फुरद (सिं.सु.फॉ.) +पालाश (म्यु.ऑ.पो.)
1. +लागणीच्या वेळी +25 (54) +60 (375) +60 (100)
2. +लागणीनंतर 6 ते 8 आठवड्यांनी +100 (217)
3. +लागणीनंतर 12 ते 16 आठवड्यांनी +25 (54)
4. +बांधणीच्या वेळी +100 (217) +55 (344) +55 (91)
एकूण +250 (542) +115 (719) +115 (191)
को. 86032 या वाणाच्या अधिक उत्पादनासाठी शिफारशीत खतमात्रेपेक्षा 25 टक्के जादा खतमात्रा म्हणजेच हेक्टरी 300 किलो नत्र, 140 किलो स्फुरद व 140 किलो पालाश वरील पद्धतीने द्यावी.
सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असणाऱ्या जमिनीसाठी गरजेनुसार एकरी दहा किलो फेरस सल्फेट व आठ किलो झिंक सल्फेट 50 ते 100 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून द्यावे. स्फुरदयुक्त खताची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेट या खतामधून द्यावी. त्यामुळे गंधक या अन्नद्रव्याची अतिरिक्त मात्रा द्यावी लागणार नाही. सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केला नसल्यास एकरी 25 किलो गंधकाची मात्रा द्यावी.

आंतरपिकांचे नियोजन

सुरू उसाचा कालावधी 12 ते 13 महिन्यांचा असतो. उसाची लागवड केल्यानंतर पूर्ण उगवण होण्यासाठी सहा ते आठ आठवड्यांचा कालावधी लागतो. सुरवातीच्या कालावधीमध्ये उसाची वाढ हळू होत असल्यामुळे उसाच्या दोन सऱ्यांमध्ये आंतरपिके घेण्यासाठी भरपूर मोकळी जागा असते. आंतरपिकांमुळे एकूण निव्वळ उत्पन्नात वाढ होते. उसासाठी बियाणे, खते व आंतरमशागतीसाठी केलेला खर्च आंतरपिकाच्या उत्पन्नातून निघून जातो. तणांच्या वाढीवर परिणाम होऊन तणांचे प्रमाण कमी होते. सुरू उसामध्ये भुईमूग, सोयाबीन, कोबी, फुलकोबी, मेथी, कोथिंबीर, कलिंगड, काकडी व कांदा ही आंतरपिके घेता येतात. द्विदल वर्गातील आंतरपिके घेतल्यास जमिनीचा पोत सुधारतो.

सुरू उसातील आंतरपिके
क्र. +पिके +पिकांच्या जाती +कालावधी (दिवस)

+भुईमूग +जे.एल.-24 एस.बी.-11, जे.एल.-501 टी.ए.जी.-24 +90 ते 95 105 ते 110 100 ते 105

+सोयाबीन +एम.ए.सी.एस.-57, फुले कल्याणी (डी.एस. 228) +90 ते 95

+कांदा +बसवंत-780 फुले समर्थ +100 ते 110 85 ते 90

+कोबी +गोल्डन एकर +65 ते 80

+फुलकोबी +स्नो बॉल-16, पुसा सिंथेटिक +70 ते 100

+मेथी +पुसा अर्ली बंचिग, कसुरी +30 ते 40

+कलिंगड +शुगर बेबी, अरका माणिक +90 ते 120

+काकडी +हिमांगी, फुले शुभांगी +--

सुरू उसामध्ये आंतरपिकाची निवड केल्यानंतर त्या आंतरपिकाच्या जमीन क्षेत्राच्या प्रमाणानुसार आंतरपिकाचे बियाण्यांचे प्रमाण ठरवावे.

संपर्क - 02169 - 265333.
(लेखक मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)
स्त्रोत: अग्रोवन