मोसंबी बागेला दीड ते दोन महिने पाण्याचा ताण बसल्यानंतर बागेतील जमीन भुसभुशीत करून घ्यावी. झाडांच्या आकारानुसार वाफे, आळे बांधून घ्यावेत. झाडांना पाणी देताना ते खोडाला लागणार नाही याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्याकरिता दुहेरी आळे (डबल रिंग) पद्धतीने रान बांधणी करावी. बहर प्रक्रियेत पाण्याचा ताण सोडताना पाच वर्षांपुढील प्रत्येक पूर्ण वाढलेल्या झाडाला महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे 800 ग्रॅम नत्र -300 ग्रॅम स्फुरद -600 ग्रॅम पालाश तसेच 20 किलो शेणखत, 15 किलो निंबोळी पेंड, 100 ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक, 100 ग्रॅम ऍझोस्पिरिलियम, 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा हरजियानम यांचा या प्रमाणात वापर प्रति झाड प्रति वर्षी करावा. ही मात्रा देताना 50 टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद, पालाश, शेणखत, निंबोळी पेंड व जैविक खते पाण्याचा ताण सोडताना पहिल्या किंवा दुसऱ्या पाण्याच्या वेळी द्यावीत. राहिलेले निम्मे नत्र फळधारणेनंतर 45 दिवसांनी द्यावे किंवा 800 ग्रॅम नत्र आणि 600 ग्रॅम पालाश ही खते तीन समान हप्त्यांत पहिल्या किंवा दुसऱ्या पाण्याच्या वेळी, त्यानंतर 45 दिवसांनी व 90 दिवसांनी आणि संपूर्ण 300 ग्रॅम स्फुरद, शेणखत, निंबोळी पेंड व जैविक खते (शेणखतात मिसळून) पहिल्या किंवा दुसऱ्या पाण्याच्या वेळी द्यावीत. खताची मात्रा देण्याची पद्धत खते देताना ती झाडांच्या विस्ताराच्या आत 30 ते 45 सें.मी. 10 ते 15 सें.मी. खोल आणि 20 ते 25 सें.मी. रुंद आकाराची रिंग करून त्यात खते टाकून बुजवून घ्यावीत, लगेच पाणी द्यावे. मोसंबी बागेस जैविक खते देताना विशेष काळजी घ्यावी. जैविक खते देताना ती इतर खतांमध्ये मिसळून नयेत. कारण त्यातील जैविक घटक मरण्याची शक्यता असते. म्हणून जैविक खते देताना ती वेगळा चर किंवा रिंग घेऊन द्यावीत. जैविक खते देताना ती शेणखतामध्ये मिसळून द्यावीत. रासायनिक खते व जैविक खते बरोबर द्यावयाची असल्यास दोन स्वतंत्र रिंगांमधून द्यावीत. बागेस खते ठिबक सिंचनाद्वारे द्यावयाची असल्यास शिफारशीत मात्रेच्या 75 टक्के नत्र आणि पालाश म्हणजेच 600 ग्रॅम नत्र आणि 450 ग्रॅम पालाश प्रति झाड प्रति वर्षी ठिबक सिंचनाद्वारे आणि 20 किलो शेणखत + 15 किलो निंबोळी पेंड + 300 ग्रॅम स्फुरद व जैविक खते प्रति झाड प्रति वर्षी जमिनीतून द्यावे. : प्रा. जगताप, 7588695336 उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी माहिती संदर्भ : अॅग्रोवन