दोन वर्षांपासून अपुरा पाऊस, कीड व रोग तसेच मृग बहरातील फुलधारणा न होणे किंवा कमी होणे यांसारख्या समस्या पेरू बागेत दिसू लागल्या आहेत. हे लक्षात घेऊन फळांच्या उत्पादनासाठी बागेच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

सध्या पेरूमध्ये फळ काढणी सुरू असून, साधारणपणे मागील हंगामातील फळ काढणी मार्चपर्यंत संपते. यानंतर झाडांना दीड महिन्याची विश्रांती द्यावी. विश्रांती दरम्यान आठवड्यातून एकदा सिंचन करावे. या विश्रांतीनंतर एप्रिल व मे महिन्यात सिंचन पूर्ण बंद करून झाडे ताणावर सोडावीत.

नैसर्गिक पानगळीनंतर या दरम्यान अंगठ्याच्या जाडीच्या फांद्या छाटाव्यात.

बागेची मशागत करावी. झाडांच्या विस्ताराखाली 3-4 इंच मातीतील तंतूमुळे लोखंडी पंजाच्या साह्याने तोडावीत, रूट प्रूनिंग करावी.

झाडांना शिफारशीनुसार खते देऊन सिंचन सुरू करावे. या सिंचनाच्या दीड महिन्याच्या कालावधीत फुलकळी लागून सेटिंगला सुरवात होते.

ताण अवस्थेत काय होते?

पाणी बंद केल्यानंतर झाडांची वाढ पूर्णपणे थांबते. शेंडे वाढ बंद होते. हळुवारपणे पाने पिवळी पडण्यास सुरवात होते. या काळात पानांतील कर्बोदके खोडामध्ये जमा होण्यास सुरवात होते.

पाने पिवळी पडण्यास सुरवात होतेवेळी, पानांमध्ये ऍबसिसिक आम्ल या वाढविरोधक संप्रेरकाची निर्मिती होते. परिणामी पेरूच्या झाडांना सुप्तावस्थेत जाण्यासाठी सूचना मिळते. पुढे झाडांतील पाने वाळून गळतात. ही अवस्था गाठण्यास जमिनीच्या प्रकारानुसार दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो. या अवस्थेत बागेमध्ये पानांची नैसर्गिक पानगळ होणे महत्त्वाचे आहे.

झाडांतील खोड व फांद्यांमध्ये कर्बोदके ः नत्र गुणोत्तर (म्हणजेच सी ः एन रेशो) वाढतो.

सध्या अनेक बागेमध्ये ताण बसलेला असला, तरी खोडामधील कर्बोदकांचा वापर झाल्यामुळे फुले निघण्यासाठी नत्रापेक्षा कर्बोदके कमी राहिली. यामुळे पावसानंतर फुटीमध्ये फुलकळी धारणा कमी झालेली आहे.

काही बागांच्यामध्ये स्फुरद व फेरससारखी अन्नद्रव्ये, झिंक आणि मॅंगेनीज सल्फेटसारखी सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत आहेत. परिणामी फांद्यांचे पोषण योग्य प्रकारे झालेले नाही.

झाडांचे पोषण

प्रतिकूल परिस्थितीत पोषणाची पूर्तता करण्यासाठी 00ः52ः34 पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि अर्धा ग्रॅम चिलेटेड फेरस व अर्धा ग्रॅम चिलेटेड झिंक सल्फेट प्रतिलिटर पाण्यात मिसळून आठ दिवसांनी दोन वेळेस फवारणी करावी.

मशागतीनंतर जमिनीतून पाच वर्षांपुढील प्रति झाडास युरिया 650 ग्रॅम, 1875 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.

यापैकी युरियाचा हप्ता तीन समान हप्त्यांत विभागून द्यावा. पहिला हप्ता मशागतीनंतर, दुसरा फुलोरावस्था व तिसरा फळाची फुगवण होताना द्यावा. सुपर फॉस्फेटचा हप्ता दोन हप्त्यांत द्यावा. पहिला मशागतीनंतर व दुसरा एक महिन्याने द्यावा. म्युरेट ऑफ पोटॅशचा हप्ता मशागतीनंतर व दुसरा फळांच्या फुगवणीच्या वेळेस द्यावा. माती परीक्षणानुसार अन्नद्रव्यांचे प्रमाण तज्ज्ञांच्या सल्ल्याने ठरवल्यास फायदेशीर ठरते.

माती परीक्षणानुसार 10 किलो फेरस सल्फेट, 5 किलो झिंक सल्फेट व 5 किलो मॅंगेनीज सल्फेट शेणखतात मुरवून किंवा शेण-गोमूत्राच्या स्लरीतून प्रतिएकरी जमिनीतून द्यावे.

पेरूवरील कीड, रोग नियंत्रण

शेंडे अळीच्या नियंत्रणासाठी दोन मिलि क्लोरपारिफॉस प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

देवी रोग नियंत्रण : ढगाळ वातावरणात देवी रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. नियंत्रणासाठी बोर्डोमिश्रण (0.6 टक्के) फवारणी करावी. यासाठी 100 लिटर पाण्यात 600 ग्रॅम मोरचूद मिसळावे. त्याचा सामू सातपर्यंत करण्यासाठी 350 ग्रॅम कळीचा चुना मिसळावा. त्यानंतर आठ दिवसांनी स्ट्रेप्टोसायक्लीन 25 ग्रॅम आणि कॅपटाफ 250 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

मर रोग नियंत्रण : दर चार ते सहा महिन्यांनी 25 किलो शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा 20 ग्रॅम आणि पॅसिलोमायसीस 20 ग्रॅम मिसळून प्रत्येक झाडास मुळाच्या परिसरात द्यावे. प्रादुर्भाव जास्त असल्यास एलिएट पाच ग्रॅम आणि क्लोरपारिफॉस 4 मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.

मुळावर सूत्रकृमीच्या गाठी

लक्षणे

पाने बारीक होतात, तसेच पाने पिवळी पडतात.

पेरू बागेतील झाडांच्या मुळांवर गाठी दिसतात.

नियंत्रणाचे उपाय

सूत्रकृमींचा प्रादुर्भाव असलेल्या बागेमध्ये वर्षातून दोन वेळेस प्रति झाड 25 शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा 30 ग्रॅम व पॅसिलोमायसीस 30 ग्रॅम मिसळून द्यावे किंवा एक लिटर स्लरीमधून आळ्यात मिसळावे.

फळधारणा कमी होत असल्यास, प्रत्येक झाडास 40 ग्रॅम फोरेट (10 टक्के दाणेदार) कीटकनाशक झाडाखाली जमिनीत आळ्यामध्ये एकसारखे मिसळावे.

अशा बागेत चांगल्या निंबोळी पेंडीचा वापर दोन किलोग्रॅम प्रतिझाड याप्रमाणात करावा.

मिलीबगचा प्रादुर्भाव

पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर, तापमानात वाढ होतेवेळी मिलीबगचा प्रादुर्भाव फांद्या, फुले व फळांचे देठ यावर होण्यास सुरवात होते.

नियंत्रणाचे उपाय

प्रत्येक झाडाच्या आळ्यामध्ये 20 ग्रॅम व्हर्टीसिलियम लेकॅनी हे बुरशीनाशक 25 शेणखताबरोबर मिसळून जमिनीत मिसळावे.

फांद्या व फळांवर मिलीबग दिसताच 5 ग्रॅम व्हर्टीसिलियम लेकॅनी व दूध 10 मि.लि. प्रति लिटर पाण्यातून झाडावर फवारावे.

प्रादुर्भाव जास्त असल्यास अबामेक्टीन (1.9 इसी) 0.5 मि.लि. प्रति लिटर किंवा ब्यूप्रोफेझीन 1.25 मि.लि.प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पेरूवरील फळमाशीचे नियंत्रण

साधारण फळे मोठी होत असताना फळमाशीचा प्रादुर्भाव वाढतो.

नियंत्रणाचे उपाय

एकरी पाच फळमाशीचे रक्षक कामगंध सापळे लावावेत. चांगल्या नियंत्रणासाठी सामूहिक पद्धतीने उपाययोजना करणे फायदेशीर ठरते.

प्रादुर्भाव जास्त असल्यास डायक्लोरव्हॉस 2 मिलि प्रति लिटर किंवा क्लोरपायरीफॉस 2 मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

संपर्क : पुरुषोत्तम हेंद्रे, 9860668892
(विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या, कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर, जि. नगर)

स्त्रोत: अग्रोवन