1) लेडीबर्ड बीटल (ढाल किडा): लेडीबर्ड बीटल या किटकाचे प्रौढ भुंगे व त्यांच्या अळ्या प्रामुख्याने मावा किडीवर जगतात. लेडीबर्ड बीटलची अंडी रंगाने पिवळसर व आकाराने लांबुळकी असून, समूहामध्ये पण उभी घातलेली असतात. याची अळी 6 ते 7 मि. मी. लांब असून, रंगाने करडी व त्यावर पांढुरके ठिपके असतात. प्रौढ तुरीच्या दाण्यासारखे, पण खालून चपटे व वरून फुगीर असतात. प्रौढ रंगाने पिवळसर, बदामी किंवा लालसर असून त्यांच्या समोरच्या पंखावर काळ्या रेषा किंवा ठिपके असतात. काही प्रजातीमध्ये ते नसतात. अळी प्रती दिवशी 25 मावा, तर प्रौढ भुंगा 56 मावा खाऊ शकतो. पिकावर मावा किडीसोबत लेडीबर्ड बीटल जास्त आढळून आल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर टाळावा. 2) क्रायसोपा: क्रायसोपाची अळी मावा, तुडतुडे, पांढरी माशी तसेच बोंडअळ्याची अंडी व त्याच्या लहान अळ्यायांचे भक्षण करते. क्रायसोपाचा पतंग पोपटी, हिरव्या व निळसर झाक असलेला असतो. मादी पतंग कपाशीच्या पानावर किंवा देठावर एकएकटी अंडी घालते. अंडे हिरव्या रंगाची असून पांढऱ्या तंतुच्या टोकावर राहते. या अंड्यातून 48 तासांत अळी बाहेर पडते व भक्षाच्या शोधात फिरते. अळी अवस्था 15 ते 27 दिवसांची असते. क्रायसोपाची अंडी उपलब्ध असल्यास हेक्टरी 10,000 अंडी या प्रमाणात कपाशीच्या शेतात एकसारख्या प्रमाणात पीक 40 ते 45 दिवसांचे झाल्यानंतर 30 दिवसांच्या अंतराने दोन वेळा सोडावीत. 3) सिरफीड माशी: हि सुद्धा मावा किडींचा महत्वाचा भक्षक कीटक आहे. सिरफीड माशीची अळी रंगाने हिरवट असून तोंडाकडचा भाग टोकदार असतो. अळीला पाय नसतात. एक अळी दिवसभरात साधारणपणे १०० मावा खाऊ शकते. या किटकाची माशी घरात आढळणाऱ्या माशीसारखीच असून तिच्या पाठीवर लाल पिवळे व काळे पट्टे असतात. माशीचे डोके लाल रंगाचे असते. 4) पेंटॅटोमिड ढेकुण: पेंटॅटोमिड ढेकुण हे ढालीच्या आकाराचे, काळपट करड्या रंगाचे असून, कापूस पिकावर सर्वत्र पाहायला मिळतात. हे ढेकुण आपली सोंड अमेरिकन बोंडअळी, उंट अळी तसेच इतर अळ्यांच्या शरीरात खुपसतात व शरीरातील द्रव शोषून घेतात. परिणामी अळी मरते. ओरीअस ढेकुण हे छोटे काळपट रंगाचे असून त्यांना सोंड असते. हे ढेकुण फुले तसेच पानांच्या बेचक्यात लपून बसतात. पिल्ले चकचकीत पिवळसर रंगाची असतात. तसेच प्रौढ व पिल्ले मावा, तुडतुडे, फुलकिडे, कोळी किडींची अंडी, तसेच लहान अळ्या यामध्ये आपली सोंड खुपसून आतील द्रव शोषण करतात, त्यामुळे किडी मारतात. 5) रेडयुव्हीड ढेकुण: हा परभक्षी कीटक असून किडीच्या शरीरामध्ये आपली सोंड टोचून रस शोषण करते व किडीला मारून टाकते. 6) एन्थोकोरीड ढेकुण: हा परभक्षी कीटक असून स्वतःच्या सोंडेने मावा बोंडअळ्या ह्या किटकाला मारून त्यातून रस शोषण करून उपजीविका करतात. 7. कोळी किंवा कातीन: कातीन हा कोळी वर्गातील असून, त्याला आठ पाय असतात. कपाशीच्या पिकामध्ये दोन प्रकारांतील कातीन आढळतात. एक जाळे करून राहणाऱ्या, तर दुसऱ्या जाळे न करणाऱ्या शिकारी कातीन. सर्व प्रकारच्या कातीन आपापल्या आकारमानाप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या किडींना खातात. त्यामुळे कातीन सुद्धा शेतकऱ्यांचा मित्र होय. स्रोत- कृषी जागरण