खडखड्या (चारकोल रॉट): हा रोग मॅक्रोफोमिना फॅझेओलीना या बुरशीमुळे होतो. या बुरशीचा शिरकाव जमिनीतून ज्वारीच्या ताटात होते. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे मुळाजवळच्या ताटाचा बुंधा नरम पडतो अशा ताटातील कांड्यांचा उभा छेद घेतला असता मध्ये फक्त काळे धागे आढळून येतात अशी रोग ग्रस्त झाडे हवे सोबत हलताना खडखड असा आवाज करतात. कालांतराने अशी झाडे कोलमडून जमिनीवर लोळतात. त्यामुळे अशा झाडांच्या कणसात दाणे भरत नाहीत. या रोगाच्या प्रादुर्भावास पाण्याची कमतरता आणि उष्ण तापमान अनुकूल असते. उपाययोजना: जमिनीत कमी ओलावा असल्यास या रोगाची लागण मोठ्या प्रमाणावर आढळून येते. त्यासाठी पीक फुलोऱ्यात असताना पाण्याचा तान असल्यास पिकास एखादे पाणी द्यावे. पिकाची फेरपालट करावी. खताची योग्य मात्रा द्यावी, शिफारशी पेक्षा जास्त नत्र व पाणी कमी दिल्यास रोगाचे प्रमाण वाढते. कोरडवाहूमध्ये पिक ३ ते ४ आठवड्यांचे झाल्यावर हेक्टरी ५ टन तूरकाट्यांचे आच्छादन केल्यास रोगाचे प्रमाण कमी होते आणि ताटे लोळण्याचे प्रमाणही कमी होते. काणी: हा रोग प्रामुख्याने रब्बी हंगामात येतो काणीचे दोन प्रकार पडतात. अ) दाणे काणी: हा रोग स्पोरीस्पोरीयम सोरघी या बुरशीमुळे होतो. ह्यात ज्वारीच्या कणसात दाणे भरण्याऐवजी तेथे काणीयुक्त दाणे तयार होतात. हे काणीयुक्त पांढरे दाणे टोकास निमुळते असून फोडले असता त्यातून काळी भुकटी म्हणजे रोगाचे बीजाणू असतात. हे बीजाणूंचा प्रसार बियांद्वारे शेतात होतो व ज्वारीच्या ताटात मुळाद्वारे प्रवेश करून त्या सदर ताटावरील कणसात दाणे काणी रोग निर्माण करतात. ब) मोकळी काणी: हा रोग स्पोरीस्पोरीयम क्रुएन्टम या बुरशीमुळे होतो. यात संसर्गित ताटामध्ये लवकरच फुलोरावस्था येवून त्यात अनेक फुटवे येतात. कणीस अतिशय मोकळे असून सर्व बीजांडात हा रोग पसरतो. उपाययोजना: पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ३०० पोताच्या गंधकाची ४ ग्रॅम किंवा ३ ग्रॅम थायरमची बीज प्रक्रिया करावी. मळणी पूर्वी काणीग्रस्त कणसे काढून नष्ट करावीत पिकाची फेरपालट करावी. लेखक: सुमेधा शेजूळ पाटील स्रोत- कृषी जागरण