नागकेशर - झाडाची लागवड

नागकेशर हा अत्यंत देखणा, मध्यम उंचीचा सदाहरित वृक्ष आहे. या वृक्षाचे खोड एक ते दोन मीटरपर्यंत सरळ वाढते. खोडाची साल गुळगुळीत, राखाडी रंगाची असते. नवीन येणारी पालवी आणि फांद्या पांढऱ्या, मखमली केस असलेल्या असतात. पाने साधी, भाल्यासारखी, तीक्ष्ण टोक असलेली असतात. फुले छान सुगंधाची एक ते तीन इंच आकाराची असतात. फुले फांद्यांच्या शेंड्याला येतात. फुलांमध्ये चार पांढऱ्या रंगाच्या मोठ्या पाकळ्या असतात. फुलांमध्ये सोनेरी पिवळ्या रंगाचे अनेक पुंकेसर असतात. फळे शंकूसारखी लंबगोल, बाह्य दलाने वेढलेली असतात. एका फळात बदामी रंगाच्या एक ते चार बिया असतात. औषधे निर्मितीसाठी फुलांमधील वाळलेले पुंकेसर आणि बिया वापरल्या जातात.

या वृक्षांस फुले फेब्रुवारी- मार्च महिन्यात येतात आणि फळे एप्रिल- मे महिन्यात परिपक्व होतात. फळांतील बिया काढून दोन ते चार दिवस सावलीत सुकवून 12 तास कोमट पाण्यात ठेवल्यास रुजवा चांगला मिळतो. रोपे तयार करण्यासाठी पाच ते आठ सें.मी. आकाराच्या पिशवीमध्ये पोयटा किंवा गाळाची माती, वाळू, चांगले कुजलेले शेणखत 2-1-2 या प्रमाणात चांगले मिसळून भरावे. प्रत्येक पिशवीत दोन बिया दोन सें.मी. खोलीवर टाकून आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. रुजवा 15 ते 21 दिवसांनी झाल्यानंतर प्रति पिशवीत एकच रोप ठेवून सेंद्रिय खतांची मात्रा आवश्यकतेनुसार द्यावी. रोपे 20-30 सें.मी. उंचीची झाल्यानंतर मोठ्या पिशवीत लावावीत.

लागवडीयोग्य रोपे एक वर्षाने तयार होतात. लागवडीसाठी शक्यतो दोन ते तीन फुटांची रोपे वापरावीत. मध्यम, भारी, निचरा होणाऱ्या जमिनीत 4 x 4 मीटर अंतराने 2 x 2 x 2 फूट आकाराचे खड्डे घेऊन लागवड केली जाते. रोपे लहान असताना तीव्र ऊन, अति थंडी, अति पाऊस यांपासून संरक्षण करावे. सुरवातीला या वृक्षाच्या वाढीचा वेग कमी असतो. लागवडीनंतर काळजी घेतल्यास पाच- सात वर्षांत फुले येण्यास सुरवात होते.

संपर्क - (02358) 282717

वनशास्त्र महाविद्यालय, दापोली

माहिती संदर्भ : अॅग्रोवन