हिवाळी हंगामात शेळ्यांची योग्य काळजी घेतली नाही तर त्यांना विविध आजार होण्याची शक्यता असते. आजारी शेळ्यांची योग्य वाढ होत नाही. आजाराची लक्षणे तपासून पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करावेत.

लाळ्या खुरकूत

दोन खूर असणाऱ्या सर्व जनावरांना हा आजार होतो. आजार संसर्गजन्य असल्याने झपाट्याने पसरतो. ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन्यांत याचा प्रादुर्भाव दिसून येतो.
कारणे -
1) हा आजार विषाणुजन्य आहे. हे विषाणू थंड वातावरणामध्ये अधिक काळ कार्यक्षम राहतात.
2) प्रसार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संसर्गाने होतो.
3) रोगी शेळ्यांची लाळ, मल-मूत्र इत्यादीने दूषित झालेले चारा, पाणी, दूषित हवा, तसेच रोगी शेळ्यांच्या संपर्कातील माणसांद्वारा या रोगाचा प्रसार होतो.

लक्षणे

1) या आजारात तोंडात विशेषतः ओठांच्या आतील बाजूस, जिभेवर, हिरड्यांवर सुरवातीस पाणी भरलेले फोड येतात. नंतर त्या भागावरील आवरणे निघून लालसर जखमा होतात. अशाच प्रकारच्या जखमा या पायाच्या खुरांमध्ये दिसून येतात.
2) आजारातून साधारणपणे 8 ते 10 दिवसांत शेळ्या बऱ्या होतात; परंतु गाभण शेळ्यांत गर्भपात, करडांचा मृत्यू, जखमांची योग्य ती काळजी घेतली नाही तर त्यात अळ्या पडून सडणे यामुळे आर्थिक नुकसान होते.
3) शेळ्यांच्या कासेवर जखमा होतात. कासेवरील जखमेमुळे कासदाह होण्याची शक्यता असते.

उपचार

1) हा आजार विषाणुजन्य असल्याने यावर निश्चित असा उपचार नाही. मात्र जखमा चिघळू नयेत म्हणून उपचार करावेत.
2) तोंड आणि खुरातील जखमा पोटॅशियम परमॅंगेनेटच्या द्रावणाने धुवाव्यात. त्यानंतर तोंडातील जखमांवर जंतुनाशक मलम लावावे. जखमेत अळ्या असतील तर टर्पेटाईन तेल टाकून अळ्या काढाव्यात. जंतुनाशक मलम लावावे. पशुतज्ज्ञांकडून शेळ्यांना प्रतिजैवक व जीवनसत्त्वांचे इंजेक्शन द्यावे.

प्रतिबंध

1) आजारी शेळ्यांना निरोगी शेळ्यांपासून वेगळे बांधावे. त्यांना स्वतंत्र चारा आणि पाणी द्यावे.
2) आपल्या भागात रोगाची लागण झालेली असेल तर नवीन शेळ्यांची खरेदी शक्यतो टाळावी.
3) शेळ्यांना दर वर्षी सप्टेंबर आणि मार्च महिन्यात लसीकरण करावे.

देवी आजार (गोट पॉक्स)

हा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार सर्व वयोगटांच्या शेळ्यांत दिसतो; परंतु करडांमध्ये हा आजार घातक ठरतो. साधारणपणे डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान याचा प्रादुर्भाव दिसतो.
कारणे -
1) आजार गोट फॉक्स नामक विषाणूमुळे होतो.
2) प्रसार प्रत्यक्ष संपर्क, बाधित खाद्य व पाणी याद्वारा होतो.
लक्षणे -
1) आजारात खूप ताप येतो, शेळ्या चारा कमी प्रमाणात खातात.
2) ओठ, नाकपुड्या, कान, सड आणि क्वचित शेपटीखाली गाठी येतात. त्यानंतर तेथे खपल्या तयार होतात. या खपल्या जाड व मोठ्या असतात.
3) नाकातील व्रणामुळे श्वसनास त्रास होतो. तोंडातील व्रणांमुळे चारा खाण्यास त्रास होतो. कासेवरील व्रणांमुळे कासदाह होण्याची शक्यता असते.
4) आजारामुळे करडांमध्ये मरतूक आढळते.
उपचार -
1) हा विषाणुजन्य आजार असल्याने थेट उपाय नाही. मात्र आजाराचे प्रमाण वाढू नये यासाठी पशुतज्ज्ञांकडून प्रतिजैवकाचे इंजेक्शन द्यावे.
2) ताप कमी होण्यासाठी पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने वेदनाशामक आणि तापनाशक इंजेक्शन द्यावे.
प्रतिबंध -
1) आजारी शेळ्यांना कळपातून वेगळे करावे. मृत शेळ्यांना जाळून टाकावे किंवा पुरून टाकावे.
2) वर्षातून एकदा डिसेंबर महिन्यात शेळ्यांना रोगप्रतिबंधक लसीकरण करावे.

फुफ्फुसदाह (न्युमोनिया)

पावसाळा व हिवाळ्यात हा आजार जास्त प्रमाणात आढळतो.
कारणे -
1) जीवाणू, विषाणू व बुरशी यांचा प्रादुर्भाव, वातावरणात अचानकपणे होणारा बदल आणि शेळ्यांना जास्त थंडी असलेल्या जागेवर बांधणे इत्यादी कारणांमुळे शेळ्यांना फुफ्फुसदाह होतो.
लक्षणे -
1) शेळ्यांना भरपूर ताप येतो, त्या चारा खाणे बंद करतात.
2) शेळ्या ठसकतात, त्यांच्या नाकातून चिकट पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचा स्राव येतो. शेळ्यांना श्वासोच्छवासास त्रास होतो.
उपचार -
1) पशुतज्ज्ञाच्या सल्ल्याने शेळ्यांना प्रतिजैवक इंजेक्शन द्यावे.
2) आजारी शेळ्यांना ताप येतो त्यामुळे तापनाशक आणि वेदनाशामक इंजेक्शन द्यावीत.
3) आजाराच्या प्रतिबंधासाठी शेळ्यांचा वातावरणातील बदलापासून बचाव करावा. शेळ्यांना थंडीपासून संरक्षित करावे.
4) योग्य व्यवस्थापन असेल तर या आजारापासून शेळ्यांचे संरक्षण करता येते.
प्रथमोपचार -
1) एका बादलीत गरम पाणी घेऊन त्यात निलगिरीचे तेल मिसळून त्याचा वाफारा शेळ्यांना द्यावा. शेळ्यांना कापूर 1 ग्रॅम व ज्येष्ठमध 4 ग्रॅम यांचे मिश्रण दिल्याने चांगला आराम पडतो.
संपर्कः डॉ. सचिन राऊत - 7588571511
(लेखक शैक्षणिक पशुचिकित्सा संकुल, पशुवैद्यक महाविद्यालय, परभणी येथे कार्यरत आहेत)

स्त्रोत: अग्रोवन