वाढत्या हवामानाचा परिणाम कुक्कुटपालनावर झालेला आढळून येतो. ऋतूंचा विचार केला असता, उन्हाळा ऋतूमध्ये कोंबडी हा पक्षी इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात उष्माघातास बळी पडतो, त्यामुळे प्रत्यक्षपणे मांसल व अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या उत्पादनात घट होते.
ज्या वेळी कोंबड्यांच्या सभोवतालचे तापमान 38 ते 40 अंश से.पर्यंत पोचते, त्या वेळी त्यांना वाढलेल्या तापमानाचा त्रास जाणवू लागतो. उष्णता कमी करण्यासाठी कोंबड्या तोंडाची उघडझाप करतात, त्याला धापा टाकणे असे म्हणतात. जास्त प्रमाणात धापा टाकल्यामुळे श्वसन संस्थेच्या कडेवर असलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होते. कोंबड्यांच्या सततच्या तोंडाची उघडझाप करण्याने श्वसनाचा वेग वाढतो, तसेच हृदयाच्या स्पंदनांमध्ये वाढ होते, त्यामुळे रक्तदाब वाढतो व यामुळे कोंबड्या मृत्युमुखी पडू शकतात.

असा ओळखा उष्णतेचा त्रास
1) कोंबड्यांना जर उष्णतेचा त्रास जाणवत असेल, तर त्या शांतपणे उभ्या राहतात, त्यांच्यामध्ये मंदपणा व सुस्तपणा दिसून येतो.
2) काही कोंबड्या या पाणी पिण्याच्या भांड्याजवळ मान वाकवून उभ्या असतात, तसेच काही कोंबड्या या भिंतीचा आडोसा घेऊन शांतपणे उभ्या असतात.
3) उन्हाळ्यात जर कोंबड्यांना उष्माघाताचा त्रास जाणवत असेल, तर त्या जास्त पाणी पितात व खाद्य कमी प्रमाणात खातात.
4) कोंबड्या शरीरातील वाढलेल्या उष्णतेला कमी करण्यासाठी व थंडपणा आणण्यासाठी त्यांचे पंख शरीरापासून दूर पसरवितात.
5) उष्णतेला कमी करण्यासाठी कोंबड्या तोंडाची सतत उघडझाप करून धापा टाकताना शेडमध्ये दिसून येतात.
6) काही कोंबड्या श्वास घेण्यास धडपडू लागतात व त्यांना दम लागतो.
7) काही कोंबड्यांना उष्माघातामुळे मानसिक धक्का बसतो, त्यांचे पाय लटपटतात आणि ठराविक काळासाठी त्या चक्कर येऊन खाली पडतात.
8) काही कोंबड्या या शेडमधील इतर कोंबड्यांच्या मागच्या भागाची पिसे तोडताना दिसून येतात.
9) कोंबड्यांच्या वजनात अचानकपणे घट होते.
10) त्यांची त्वचा रखरखीत होते व रंगांमध्ये फरक दिसून येतो.
11) कोणत्याही प्रकारचे कारण नसताना, कोंबड्यांच्या अंडी देण्याच्या व अंडी उबविण्याच्या क्षमतेतसुद्धा कमीपणा आलेला दिसून येतो.
12) कोंबड्यांच्या अंड्यांचा आकार हा लहान होतो व त्यांच्या अंड्यांच्या कवचाची गुणवत्ता निकृष्ट दर्जाची झालेली दिसून येते.
13) मांसल कोंबड्यांमध्ये उष्माघातामुळे वाढीचा दर कमी होतो व त्या अधिक प्रमाणात उष्माघातामुळे मृत्युमुखी पडतात.

उन्हाळ्यातील व्यवस्थापन

कोंबड्यांना उष्माघातापासून वाचविण्यासाठी त्यांना चांगल्या प्रकारे आच्छादित भिंत व छताच्या शेडमध्ये ठेवावे. त्याचप्रमाणे शेडमध्ये हवा खेळती राहील अशा ठिकाणी व दिशेस शेडची बांधणी करावी. छताच्या पुढच्या बाजूला 24 इंच एवढ्या लांबीचे आच्छादन बसवावे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी छताची सफाई करावी व त्यास पांढऱ्या रंगाने रंगविणे फायदेशीर ठरते, तसेच छतावर वाळलेल्या गवताच्या पेंढ्या, भाताचा कोंडा टाकावा व त्यास ओले ठेवावे.

दिवसातून तीन-चार वेळेस छतावर पाण्याची फवारणी करावी. असे केले असता शेडमधील तापमान कमी होऊन कोंबड्यांना थंडावा मिळतो. शेडच्या एका बाजूला पोत्याचे पडदे लावून त्यावर पाणी शिंपडावे, जेणेकरून शेडमध्ये थंडपणा राहील व कोंबड्यांना उष्माघातापासून वाचविता येईल. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेडमध्ये ताजी हवा खेळती ठेवणे फार महत्त्वाचे आहे. हवा खेळती न राहिल्यामुळे शिळी व दूषित हवा पक्ष्यांच्या शेडमध्ये तयार होते व त्या हवेत अमोनिया, ओलसर कार्बन- डाय- ऑक्साईड व धुळीचा शिरकाव होतो व कोंबड्यांवर ताण येऊ शकतो.

नैसर्गिक हवा शेडमध्ये खेळती ठेवण्यासाठी पंख्यांचा वापर करावा, जेणेकरून शेडमधील हवेची हालचाल वाढेल व आत असलेली अधिक उष्णता बाहेर टाकली जाईल. त्याचप्रमाणे शेडमध्ये तयार झालेली शिळी हवा बाहेर घालविण्यासाठी बाहेर हवा फेकणाऱ्या पंख्यांचा वापर करणे फायदेशीर ठरेल. उष्माघातावर मात करण्यासाठी आहारातील समतोल राखणे गरजेचे आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोंबड्यांच्या खाद्यांमध्ये अचानकपणे बदल करू नये. उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना खात्रीशीर, स्वच्छ, थंड व मुबलक पाण्याची व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे. याकरिता शेडमधील पिण्याच्या पाण्याची भांडी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये 35-50 टक्क्यांनी वाढवावी.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोंबड्यांच्या जास्त हालचालींमुळे त्यांच्या शारीरिक उष्णतेत वाढ होऊन, त्यांच्यावर उष्णतेचा ताण येऊ शकतो. हे टाळण्यासाठी कुक्कुटपालकाने व तेथील कामगाराने जास्त वेळा शेडमध्ये जाणे टाळावे. शेडमध्ये पक्ष्यांची अधिक गर्दी असेल, तर पक्ष्यांची घनता कमी करावी.

1) संपर्क - 02169 - 244214
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा
2) 022 - 24131180, 24137030, विस्तारित क्र. 136 (फक्त कार्यालयीन वेळेत.)
कुक्कुटपालन शास्त्र विभाग, मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, परळ, मुंबई

स्त्रोत: अग्रोवन