सध्या डाळिंब उत्पादक पट्ट्यात बागांमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव दिसतो आहे. बागायतदारांनी सामुदायिक पद्धतीने एकात्मिक रोग नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

तोष सूत्रकृमी, खोड किडा, फ्युजॅरियम, रायझोक्टोनिया, सिरॅटोसिस्टीस बुरशीचा प्रादुर्भाव तसेच अति पाणी दिल्याने मर रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आहे.

लक्षणे

1) शेंड्याची पाने पिवळी पडून फांद्या वाळतात.
2) खोडातील गाभा पडतो.
3) खोडाच्या खालच्या बाजूला बुरशीची वाढ होते.

नियंत्रणाचे उपाय

रोगाचा प्रादुर्भाव झालेली बाग -

मर रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या बागेत हेक्झाकोनॅझोल 15 मि.लि. किंवा प्रोपीकोनॅझोल 15 मि.लि.किंवा कार्बेन्डेन्झिम 20 ग्रॅम यापैकी कोणतेही एक आणि त्यामध्ये क्लोरपायरिफॉस 25 मि.लि. दहा लिटर पाण्यात द्रावण तयार करावे. यातील पाच लिटर द्रावण प्रति झाडाच्या आळ्यात खड्डा रिंग पद्धतीने ओतावे.

संपूर्ण झाडावर हेक्झाकोनॅझोल 10 मि.लि. किंवा कार्बेन्डान्झिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

वाळलेले झाड उपटून नष्ट करावे.

झाडाच्या छाटलेल्या भागांना 10टक्के बोडोपेस्ट (1 किलो मोरचूद + 1 किलो चुना + 10 लिटर पाणी) लावावी.

खोडकिडीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना

1) गेरू पेस्ट - 10 लिटर पाण्यात गेरू 4 किलो + क्लोरपायरीफॉस 50 मि.लि.+ कॉपर ऑक्सिक्लोराइड 25 ग्रॅम मिसळून खोडास दोन फुटापर्यंत दुसऱ्या वर्षापासून लावावी.
2) इंजेक्शनद्वारा डायक्लोरव्हास 10 मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून छिद्रांमध्ये सोडावे. छिद्रे बंद करावीत.

सूत्रकृमी नियंत्रण

1) फोरेट 20 किलो प्रति हेक्टरी जमिनीत मिसळून द्यावे.
2) आंतरपीक म्हणून झेंडू लागवड करावी किंवा उन्हाळ्यात ड्रिपरजवळ झेंडू रोपांची लागवड करावी.

नवीन लागवड करतानाच्या उपाययोजना

हलकी ते मध्यम प्रतीची जमीन लागवडीसाठी निवडावी.

लागवडीपूर्वी खड्डे उन्हात तापून द्यावेत.

रोगविरहित रोपे लागवडीसाठी वापरावी.

4.5 मीटर बाय 3 मीटर अंतरावर 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर आकाराचे खड्डे घ्यावेत.

पाच लिटर पाण्यात 10 ग्रॅम कार्बेन्डाझिम मिसळून प्रत्येक खड्ड्यात शिंपडावे.

क्लोरपायरीफॉस 50 मि.लि.प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून प्रत्येक खड्डात शिंपडावे.

कॅल्शियम हायपोक्लोराइट 100 ग्रॅम प्रति खड्डात धुरळावे.

शेणखत 20 किलो, गांडूळखत 2 किलो, निंबोळी पेंड 3 किलो, ट्रायकोडर्मा प्लस 25 ग्रॅम, ऍझोटोबॅक्टर 15 ग्रॅम, पीएसी 15 ग्रॅम या मिश्रणाने खड्डे भरावेत.

गरजेनुसार पाणी द्यावे.

संपर्क - संतोष मरभळ - 9405851848

(लेखक डाळिंब संशोधन केंद्र, लखमापूर, जि. नाशिक येथे कार्यरत आहेत)

स्त्रोत: अग्रोवन