कागदी लिंबू लागवडीविषयी माहिती कागदी लिंबू पिकाला मध्यम काळी, हलकी मुरमाड, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, जास्त चुनखडी व क्षार नसणारी जमीन निवडावी. साधारणपणे 6.5 ते 7.5 सामू व क्षारांचे प्रमाण 0.1 टक्क्यापेक्षा कमी असलेली जमीन कागदी लिंबू लागवडीस चांगली असते. हे बागायती बहुवर्षीय फळझाड असल्यामुळे हमखास पाणीपुरवठ्याची सोय असेल तेथेच लागवड करावी. लागवड 6 x 6 मीटर अंतरावर करावी. लागवडीसाठी 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे उन्हाळ्यात खोदून उन्हात चांगले तापू द्यावेत. पावसाळ्यापूर्वी प्रत्येक खड्ड्यात दिड किलो सिंगल सुपर फॉस्फेट, पाच ते सहा घमेली चांगले कुजलेले शेणखत, निंबोळी पेंड व चांगल्या पोयटा मातीने खड्डे भरावेत. त्यानंतर जातिवंत रोपांची लागवड करून योग्य व्यवस्थापन करावे. लागवडीसाठी विक्रम, प्रमालिनी, साई सरबती, फुले शरबती या जातींची निवड करावी. कागदी लिंबाच्या झाडांची लागवड सुरवातीच्या चार-पाच वर्षांपर्यंत फळे येण्यापूर्वी लिंबाच्या दोन झाडांमधील मोकळ्या जागेत सुरवातीला कांदा, लसूण, मूग, चवळी, हरभरा, घेवडा, भुईमूग, गहू, मोहरी यांसारखी आंतरपिके घ्यावीत. आंतरपिके घेताना मुख्य पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होणार नाही आणि बागेची सुपीकता कायम राहील याची काळजी घ्यावी. मुख्य पिकाव्यतिरिक्त आंतरपिकास शिफारशीप्रमाणे खताची वेगळी मात्रा द्यावी. संपर्क - 02426- 243861 कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी ------------------------------------------------------------------------------------------------ स्त्रोत : अग्रोवन