भात जातीच्या अधिक उत्पादन देणाऱ्या जाती विकसित करण्यासाठी संशोधक प्रयत्न करत आहेत. निवड पद्धती आणि संकरित पैदास पद्धतीचा वापर करून नव्या जाती विकसित केल्या जातात. नुकताच पाकिस्तानमधील हजारा विद्यापीठातील संशोधक डॉ. फिदा मोहंमद अब्बासी यांनी जगातील सर्वाधिक उत्पादन देणारी भात जात विकसित केल्याचा दावा केला आहे. या जातीचे उत्पादन हेक्टरी 12 टन आहे. याच्या ओंब्यांची लांबी 40 ते 45 सेंटिमीटर असून, दाण्यांची संख्या 600 ते 700 आहे. या जातीचे काड व पाने काढणीच्या वेळेपर्यंत हिरवी राहतात. त्यामुळे याच्या पानांचा वापर जनावरांच्या चाऱ्यासाठी करता येऊ शकतो.

...असे आहे संशोधन

डॉ. अब्बासी हे हजारा विद्यापीठात जेनेटिक्स या विषयातील प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी या विषयी बोलताना सांगितले, की सध्या प्रचलित असलेल्या भात जाती पाच टन प्रति हेक्टरी उत्पादन देतात. नव्याने विकसित केलेल्या भात जातीचे उत्पादन 12 टन प्रति हेक्टरी आहे, तसेच स्थानिक जातींपेक्षा ही जात 20 दिवस आधी काढणीला येते, त्यामुळे भाताच्या काढणीनंतर त्या शेतात बटाट्यासारख्या अन्य पिकांची लागवड करता येणे शक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्याला अधिक फायदा मिळवणे शक्य होणार आहे.

सर्वसाधारणपणे भाताच्या ओंबीमध्ये 250 ते 300 दाणे चांगले भरलेले असतात, बाकीचे दाणे फोफसे असल्याचे दिसून येते. डॉ. अब्बासी यांनी भात जात पैदास करण्याच्या प्रकल्पावर नऊ वर्षांपूर्वी संशोधन सुरू केले. त्यांनी प्रचलित असलेल्या भात जाती ओरायझा लॉंगीस्टीमिनाटा, जेपी - 5, बासमती 385 आणि केएस 282 यांच्या संकरित आणि निवड पद्धतीच्या वाण विकसनासाठी कार्य केले.

या नवीन भात जातीची पाने ही अधिक काळापर्यंत हिरवी राहतात, त्यामुळे यात प्रकाश संश्लेषणाची क्रिया जास्त काळ सुरू राहते. त्यामुळे प्रत्येक ओंबीमध्ये दाण्यांची संख्या वाढून ती 600 ते 700 च्या दरम्यान राहते. या ओंबीची लांबीही वाढली असून, ती सर्वाधिक 40 ते 47 सेंटिमीटर आहे, तसेच ही जात बॅक्टेरियल ब्लाईटसाठी प्रतिकारक आहे. या भात जातीच्या लागवडीमुळे अधिक उत्पादनाबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत मिळणार आहे.

"ग्रीन सुपर राइस'ची वैशिष्ट्ये

ओंब्यांची लांबी 40 ते 45 सेंटिमीटर

दाण्यांची संख्या 600 ते 700

उत्पादन 12 टन प्रति हेक्टर

या जातीचे काड व पाने काढणीच्या वेळेपर्यंत हिरवी राहतात, त्यामुळे या पानांचा वापर जनावरांच्या चाऱ्यासाठी करता येऊ शकतो.

स्त्रोत: अग्रोवन